Butibori-स्थानिक नगरपरिषदेच्या हद्दीतील एकूण नऊ प्रभागांत नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३८१ लाभार्थ्यांना आदेशवाटप शुक्रवारी (२२ जुलै) दुर्गामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. नागरिकांना सर्व निकषांची माहिती देऊन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.
त्यानंतर अर्ज भरून घेण्यात आले. योजनेच्या घटक क्रमांक चार बीएलसीनुसार स्वतःच्या मालकीच्या जागेवर वैयक्तिक स्वरूपाचे घरकुल बांधकाम याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३८१ लाभार्थ्यांना मंजुरी प्राप्त झाली. आमदार समीर मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुजर, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, नियोजन सभापती मनोज ठोके, आरोग्य सभापती मुन्ना जयस्वाल, बालकल्याण सभापती संध्या आंबटकर, मुख्याधिकारी आर्शिया जुही, प्रशासकीय अधिकारी सुभाष श्रीद्ममवार, नगरसेवक प्रवीण शर्मा, आकाश वानखेडे यांच्यासह नगरसेवकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गृहनिर्माण करून गोरगरिबांना घर मिळावे, यासाठी ही योजना सुरू आहे, असे सीईओ अर्शिया जुही यांनी सांगितले. आमदार समीर मेघे आणि नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या पुढाकाराने ही योजना पूर्णत्वास येत आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत नागरिकांनी आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नगरपरिषद कार्यालयात सादर करावे, असे आवाहन प्रशासनाचे आहे.