वीजकर्मचाऱ्यांची तक्रारकर्त्यांशी असभ्य वर्तणूक

बुटीबोरी शहर प्रतिनिधी-नागरिक आणि प्रशासन मग ते कोणतेही असो यांच्यात समन्वय साधून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाचा दुवा म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र माध्यमाकडे बघितले जाते.मात्र काही विभागातील उर्मठ अधिकारी वा कर्मचारी हे या दुव्याला पायाखाली तुडवून मीच मोठा असा आव आणण्याचा प्रयत्न करतात.असाच काहीसा एक प्रकार बुटीबोरी वीज विभागाच्या एका कर्मचाऱ्याकडुन घडल्याचे निदर्शनास आले असून अशा उर्मठ कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ बुटीबोरीचे अध्यक्ष नासिर हुसेन यांच्या नेतृत्वात बुटीबोरी वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.


दि.१७ जुलै रोजी बुटीबोरी नवीन वसाहतीच्या प्रभाग क्र.१ मधील डायमंड सोसायटी या परिसरातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने तेथील नागरिकांनी त्याच परिसरातील एका दै. वृत्तपत्र माध्यमाच्या वार्ताहरासी संपर्क करून वीज खंडित होण्याबाबत चौकशी करण्याची विनंती केली.त्यांनी आपल्या परिचित वीज विभागाचे कर्मचारी यांना संपर्क केला असता त्यांनी “आता माझी सुट्टी झाली आहे तर तुम्ही दुपार पाळीतील कर्मचार्यांशी संपर्क करा” असा सल्ला देऊन संबधित कर्मचार्यांचे त्यांनी वार्ताहरास दोन फोन नंबर दिले त्यातील एक नंबर स्विच ऑफ होता.


म्हणून त्यांनी दुसरा क्रमांक ७८७५७६०४०८ यावर फोन लावला.त्यावर कुणी मेश्राम नावाचे वीज कर्मचारी बोलले असता त्यांनी “तुमच्या एरियातली लाईट सुरूच आहे.जर बंद असती तर आम्ही लाईट सुरू करायला आलो नसतो का..? असे उत्तर देऊन “तुम्ही संदीप राऊत सी बोला” म्हणून त्यांनी दुसऱ्या कर्मचार्याकडे फोन दिला.तेव्हा त्याच फोनवरून संदीप राऊत यांनी “तुमचा परिसर माझ्याकडे येत नाही, तुम्ही मला फोन करायचा नाही” असे उर्मठ उत्तर दिले.त्यावर वार्ताहरांनी आपली ओळख सांगितली असता संदीप राऊत यांनी “हो मला माहित आहे तू पत्रकार आहे..असे खूप पत्रकार मी बघितले आहेत.तुला जे करायचं ते करून घे” असे उद्गट भाष्य करून फोन कट केला.


समाजात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला एक विशेष स्थान असून त्यावर नागरिक विश्वास करतात.
नागरिकांच्या हितार्थ संबधित प्रशासनाला विचारपूस करतेवेळी जर त्यांना विभाग कर्मचाऱयांकडून अशा प्रकारच्या असभ्य वर्तणुकीला सामोरे जावे लागत असेल तर सर्वसामान्य जनतेला हे कर्मचारी कशा प्रकारची वागणूक देत असतील हा एक कळीचा मुद्दा बनला आहे.
अशा उर्मठ कर्मचाऱ्यावर ठोस कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नागरिकांनी केली आहे.निवेदन स्वीकारते वेळी कनिष्ठ अभियंता मनोज मेहुणे, वीज विभागाचे आष्ठनकर उपस्थित होते. यावेळी स्थानिक राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमण राखुंडे,प्रवक्ता चारुकेश कापसे,नागरिक गजानन लकडे,शरद मिलिमिले,
अक्षय धोटे,शुभम मोहोड आदी उपस्थित होते.



कार्यालयातच दारू ढोसत असल्याच्या तक्रारी
ज्यावेळी कनिष्ठ अभियंता हजर नसतांना वा रजेवर असतांना काही वीज कर्मचारी हे कर्तव्यावर असताना कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यालयातच गुथा जमवून दारू ढोसत असतात असी चर्चा असून अशा व्यसनाधीन कर्मचाऱयांमुळे नागरिकांना कमालीचा मनःस्ताप होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने अशा कर्मचाऱयांकडून नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब या विभागाकरिता लाजिरवाणी ठरत असून आता त्यांचेवर कार्यवाही होईल का..?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

“सदर प्रकाराची चौकशी करण्यात येईल.दोषी कर्मचाऱ्यांवर नक्कीच कार्यवाही केली जाईल.”- नारखेडे,उपकार्यकारी अभियंता वीज विभाग,बुटीबोरी.