» मंगरूळ ग्रा. पं. अंतर्गत जुनापाणी येथील घटना
१३ हेक्टर आर. शेतजमीन पाण्याखाली, पिकांचे नुकसान
१८१ पाळीव जनावरे वाहून गेली
मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत. अनेक तलाव, धरणेही जवळपास १०० टक्के भरली आहे. अशातच आज दि. १५ जुलै रोजी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान नागपूर ग्रामीण तालुक्यातील मंगरूळ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या जुनापाणी येथील तलावाचा बांध फुटल्याने संपूर्ण गावात तलावाचे पाणी शिरले. यामुळे १८१ पाळीव जनावरे वाहून गेले तर १३ हेक्टर आर. शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंगरूळ ग्रा.पं. अंतर्गत येणारे जुनापानी हे १५-२० घरे असलेले लहानसे गाव. येथील लोकसंख्या ६० ते ७० च्या घरात असून सर्वांचा व्यवसाय हा शेती व शेतीशी पूरक असे जोडधंदेच आहे. ज्यात काही लोक बकरी, शेळी, गायी पालन, कुक्कुट पालन तर काही लोक दुग्धव्यवसाय करतात. अनेकजण शेती व शेतमजुरी करून आपली उपजीविका भागवत असतात. गत आठ-दहा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेले आहे. तर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुनापाणी गावालगत असलेला •
तलाव ओव्हर फ्लो झाला होता. अशातच आज शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक या तलावाचा बांध फुटला व पाण्याचे लोंढे थेट गावातून वाहू लागले. अनेकांच्या घरात पाणी घुसले. यात ग्रामस्थांचे एकूण १८१ जनावरे वाहून गेली. यात १८ गायी, ५ बैल, ७१ बकऱ्या, १ वासरू, ८६ कोंबड्या असल्याची प्राथमिक माहिती मंडळ अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अल्का मोडक यांनी दिली आहे.
तसेच शेतशिवार पाण्याखाली आल्याने पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशीष वानखेडे यांनी गावात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. #BUTIBORI