बुटीबोरी : मद्यधुंद इसमाने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सावंगी येथे २६ मे रोजी रात्री ११.३० वाजता घडली. चंदू गोदरू मरसकोल्हे (४२, रा. सावंगी, ता. हिंगणा) असे गळफास लावणाऱ्या इसमाचे नाव आहे. अनिकेत बंडू मरसकोल्हे (२०, रा. सावंगी, ता. हिंगणा) याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून, मृतक चंदू कंत्राटी पद्धतीने रोजमजुरी करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. नेहमी तो दारू पिऊन राहायचा. गुरुवारी त्याची पत्नी गावात भजनासाठी गेली होती. त्यावेळी घरी कुणीही नव्हते.
अनिकेत हा चंदूच्या घराशेजारी फेरफटका मारत असताना त्याला चंदूच्या घराचे दार उघडे आणि लाइट सुरू दिसला. त्याने शेजारी बसलेल्या आजीबाईला विचारले. तिने चंदूची पत्नी भजनास गेली असून चंदू दारू पिऊन झोपला असेल असे सांगितले. अनिकेतने चंदूच्या घरात डोकावून पाहिले असता तो छताच्या लोखंडी हुकाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता रवाना केला. मृतकाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.