वेतनवाढीवरून केले कर्मचाऱ्यांनी काम बंद

बुटीबोरी येथील मोरारजी टेक्स्टाइल्समधील कंत्राटी कामगारांनी वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा प्रभाव कंपनीच्या कामकाजावर पडत आहे.

‘मोरारजी’मध्ये सहा दिवसांपासून आंदोलन

कंत्राटी कामगारांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांना गेल्या काही वर्षांपासून वेतनवाढ मिळालेली नाही. त्यांना डीए तसेच इतर कुठल्याही सुविधा नाहीत. यासंदर्भात यापूर्वीदेखील मागणी करण्यात आली होती. तेव्हा राज्य कामगारमंत्री बच्चू कडू यांनी कामगारांतर्फे कंपनी आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा केली होती. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच इतर सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ३ मार्च रोजी आंदोलनाची पूर्वसूचना देत काम बंद ठेवले. ३१ मार्चपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान चर्चेच्या फैरी झडल्या असून यावर कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही.

याबाबत कंपनीचे एचआर शरद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांसोबत सतत चर्चा सुरू आहे. कंत्राटी आणि कायमस्वरूपी अशा दोन्ही स्वरूपातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. या दोन्ही प्रकारांतील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार सुरू आहे. आमच्या जिवाला धोका आंदोलनस्थळी कंपनीतील कर्मचारी, अधिकारी यांच्याशिवाय काही असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. त्यांच्याद्वारे शांततापूर्ण वातावरणात सुरू असलेल्या गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यापासून आंदोलनकर्त्यांच्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.