free butibori photo

सावधान ! बटीबोरीत सोशलमीडियावरील टवाळटोळी सक्रिय

बुटीबोरी: फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करायचा. गोड गोड बोलायचं. अल्पवयीन शाळकरी मुली व महिलांना जाळ्यात ओढायचं. त्यांना व्हॉट्सअप नंबर मागायचा. व्हिडिओ कॉलिंग करायचं. व्हिडिओ किंवा फोटो मिळवायचे. ते अपद्वारे अश्लील पद्धतीने एडिट केल्यानंतर सोशलमीडियावरील टवाळटोळीचं सुरू होते टार्गेट ‘ब्लॅकमेलिंग मिशन’. ही टवाळटोळी अल्पवयीन मुली व महिलांकडून पैसे, दागिने मागतात. काही महिलांना शरीरसुखासाठी ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार खुलेआम सुरू आहे. यात गुरफटलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशीच एक टवाळटोळी बुटीबोरी परिसरात सक्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. यावर पोलिसांनी वेळीच आवर घालावा. अन्यथा अक्रीत घडण्याची दाट शक्यता आहे.

औद्योगिक वसाहतीचे शहर म्हणून परिचित असलेले बुटीबोरी हे १५० गावखेड्यांची बाजारपेठ म्हणून नेतृत्व करते. त्यामुळे मानवजातीला उपयोगी पडणाऱ्या सर्व गरजांची पूर्वी या ठिकाणी होते. शाळा-महाविद्यालये असल्याने शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी आहेत. लगतच औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे हजारो परप्रांतीय या ठिकाणी राहतात. त्यामुळे कोण कसा, याची ओळख करणे कठीण होते. आज सोशलमीडिया म्हणजे तरुणपिढीचा जीव की प्राण आहे. तरुणपिढी व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरचा सराईतपणे वापर करीत आहेत. याचा फायदा घेत काही टोळक्यांकडून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अल्पवयीन मुली व महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्यांचे शोषण केले जात आहे. काही प्रकार पालक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले. मात्र सोशलमीडियाचा वापर करणाऱ्या मुली आणि महिलांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

तीन वर्षांत सहा गुन्ह्यांची नोंद

बुटीबोरी परिसरात लॉकडाउनकाळात शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे अल्पवयीन मुलामुलींमध्ये मोबाइलचा वापर सर्वाधिक झाला. यादरम्यान टवाळटोळीकडून ह मुलींची फसवणूक करण्यात आली. यासंबंधी बुटीबोरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत. अशा प्रकारांत मुलीसह मुलांचीही फसवणूक होत आहे. अशाच एका व्हिडिओ कॉलिंगप्रकरणात एमआयडीसी बोरी ठाण्यांतर्गत २८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे

टोळीचा परिसरात राबता

काही दिवसांपासून बुटीबोरी परिसरात एक टवाळटोळी सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात काही मुली अशा प्रकारांना बळी पडल्या आहेत. मात्र बदनामीपोटी पीडित मुली आणि त्यांचे पालक पोलिसांकडे गेले नाहीत. याबाबत प्रशासनाकडे गोपनीयतेच्या धोरणाची तरतूद आहे. त्यामुळे पीडितांनी कशाचीही तमा न बाळगता अशा प्रकारांची तक्रार दाखल करणे गरजेचे झाले आहे. नाहीतर अनर्थाला तोंड द्यावे लागेल.

फेसबुकवरील कोणत्याही अनोळखी व्यक्तींची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अनावश्यक चॅटिंग करू नये. कुणी सोशलमीडियाच्या माध्यमातून बळी पडत असेल, तर त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. पोलीस नक्कीच कार्यवाही करेल.पूजा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी