बुटीबोरी पोलिस ठाण्यांतर्गत घटना : आणखी घरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न फसला
बुटीबोरी, वार्ताहर. घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 3 घरांची घरफोडी करून मुद्देमाल लांबविल्याची घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वीर सावरकर कॉलोनी प्रभाग क्र. 7 बुटीबोरी येथे दि. २१ ते २२ आक्टोंबर रोजीच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक प्रभाग क्र.7 मध्ये वीर सावरकर कॉलोनी असून सध्या नवरात्रीचे पर्व सुरू असल्याने परिसरातील बरेच नागरिक हे गावोगावी गेले असल्याने नेमकी हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घटनादिनी एकाच रात्री 3 घराच्या पुढील दाराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या आणि मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
फिर्यादी गोवर्धन खुशाल हटवार (42), अंकुश वसंत मेहता ( 45 ) आणि मोहिनूर रहमान अंसारी ( 52 ) हे सर्व राहणार वीर सावरकर कॉलोनी असे घरफोडी झालेल्या पीडितांची नावे असून हटवार यांचे घरून 7 हजार रुपये नगदी आणि एक 3 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, मेहता यांचेकडील 4 हजार रुपये नगदी तर अंसारी यांचे घरील चोरांना कुठलाही मुद्देमाल हाती लागला नाही. सदर घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत भोयर, पोलिस उपनिरीक्षक मुन्नासिंग ठाकूर आणि पोह अरविंद चौहान यांनी घटनास्थळे गाठून पंचनामा केला आणि अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत