बुटीबोरी, ता. २९ः एमआयडीसी बुट्टीबोरी येथे रस्त्यावर चालत असलेल्या एका कामगाराच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून पळून जाणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलिसांनी दोन तासात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल फोन व मोटारसायकल जप्त करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्याची कामगिरी पार पाडली.
एमआयडीसी बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत औद्योगित क्षेत्र असल्याने बाहेरच्या राज्यातून कंपनीत काम करण्याकरीता आलेले कामगार संजय निताई माहातो (वय २८, ग्रामपोस्ट राधामोहनपूर, पश्चिम बंगाल) हे गुरुवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या दरम्यान दुकानातून सामान घेवून कंपनीत परत जात होते. दरम्यान एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी माहातो त्यांच्या हातातील मोबाईल (किंमत १२, ५००) जबरीने हिसकावला व तेथून पळ काढला. माहोतो यांनी पोलिस ठाणे बुट्टीबोरी एमआयडीसी येथे येऊन घटनेची तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून घटनेची नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपूर विभाग नागपूर व सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक अग्रवाल यांना बुट्टीबोरी येथील डी.बी पथकाला गुन्हेगाराचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांनी डी.बी पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी, पोलिस हवालादर लक्ष्मण बन्ने, पोलिस नाईक श्रीकांत गौरकार हे पोलिस ठाणे परिसरात रवाना झाले व गुन्हेगार पंकज मोहन बांगरे (वय २१, सुकळी बेलदार, ता. हिगणा), प्रज्वल फिरोज आलोने (वय २३, म्हाडा कॉलनी बुट्टीबोरी) यांना ताब्यात घेतले.